hijab row: Hijab row : हिजाब घालून तरूणी उतरल्या फुटबॉलच्या मैदानात; हिंदू-मुस्लीम एकात्मतेचा संदेश – hijab row girls played football match wearing hijab and black dupatta for hindu muslim unity
ठाणे : कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद सुरू झाल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आता कर्नाटकातील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाण्यातील मुंब्रा परिसरात हिंदू आणि मुस्लीम तरुणी फुटबॉल मैदानात उतरल्या. त्यांनी हिजाब आणि काळी ओढणी परिधान करून फुटबॉल खेळून या घटनेचा निषेध नोंदवला. हिजाब परिधान करून फुटबॉल खेळण्याचा उद्देश म्हणजे कोणीही धमकावणे, घाबरवणे, किंवा शिक्षणात अडथळा आणून प्रत्यय आणू नये असा आहे, असं या तरुणींचं म्हणणं आहे.
ठाण्यातील मुंब्रा परिसरात गेल्या ५ वर्षांपासून हिंदू -मुस्लीम एकात्मतेचा संदेश फुटबॉल खेळातून दिला जात आहे. सध्या चर्चेत आलेल्या या व्हिडिओमध्ये मुस्लीम तरुणी हिजाब घालून तर, हिंदू महिला काळी ओढणी बांधून एकत्रित फुटबॉल खेळताना पाहायला मिळत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून रोज आम्ही फुटबॉल खेळत असून, खेळात आम्ही कधी हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला नसल्याचे यावेळी फुटबॉल प्रशिक्षिका सबा परवीन यांनी सांगितले. तर आम्हा सगळ्यांना एकत्रित राहायचे असून हिजाब परिधान करणे हा मुस्लीम तरुणींचा अधिकार आहे. त्या पहिल्यापासून हिजाब परिधान करत आहेत. त्यांनी काय घालायचं, काय नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्या विरोधात नाहीत, तर त्यांच्या सोबत आहोत. या आधी कधी असे झाले नाही, की हिजाब किंवा बुरखा त्यांनी घातला पाहिजे की नाही? ही त्यांची आवड आहे, ही त्यांची निवड आहे. त्यांना आमचे समर्थन असल्याचे फुटबॉल खेळणाऱ्या हिंदू तरुणींनी सांगितले.