Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज सत्यात उतरवला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर ‘स्वार’ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. आज पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवीत घोडीवर स्वार झाले.
निमगाव दावडी हा खंडोबाच्या मानाचा हा घाट आहे. आज बैलगाडा मालक या मानाच्या घाटात स्वखुशीने त्यांच्या सर्जा-राजाची जोडी उतरवल्या आहेत. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे त्यांचा शब्द पूर्ण केला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao Patil) यांनी याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांना 11 फेब्रुवारीला छेडलं होतं. प्रचारात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आढळरावांनी त्यांच्या गावातील घाटात येण्याचं आमंत्रण कोल्हे यांना दिले होते. आढळराव पाटील यांनी कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं. बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. या कोल्हेंच्या आश्वासनावरून आढळराव पाटलांनी त्यांना अनेकदा घाट दाखवला. पुढे देखील ते अनेकदा कोल्हेंना या मुद्यावरुन कोंडीत पकडू शकतात, हे लक्षात आल्यानं पहिल्या बारीत नाही तर नाही निदान मानाच्या घाटात तरी घोडीवर बसण्यासाठी कोल्हे आज तयार झालेत. कोल्हेंची बारी पाहायला बैलगाडा शौकिनांना देखील उत्सुकता लागलेली होती. अखेर ती शौकिनांची इच्छा कोल्हेंनी पूर्ण केली आहे.