मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात बहादूर शेख नाका येथे हा अपघात झाला. डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. श्रुती संतोष शिर्के (वय १७, मूळ राहणार भोम) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही तरूणी दुचाकीवर पाठीमागे बसली होती. डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर तरूणी खाली पडली. त्यानंतर भरधाव डंपरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
पोलिसांकडून मिलेलेल्या माहितीनुसार, जान्हवी एकनाथ जाधव (रा. दळवटणे) ही दुचाकी चालवत होती. तिच्या पाठीमागे श्रुती शिर्के बसली होती. या दोघीही बहादूर शेख नाका येथे जात होत्या. त्याचवेळी डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर श्रुती दुचाकीवरून खाली पडली. त्यानंतर ती डंपरखाली सापडली. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तर या अपघातात जखमी झालेल्या जान्हवी जाधव हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.