शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल, मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी किरीट सोमय्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांना उत्तर दिले होते. कोर्लईत ठाकरे कुटुंबीयांचे १९ बंगले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. पण तिथे कोणतेही बंगले नाहीत. त्या बंगल्यांवर आपण पिकनिकला जाऊ. तिथे १९ बंगले दिसले तर, मी राजकारण सोडेन आणि बंगले नसतील तर, जोड्याने मारेन, असे आव्हान राऊत यांनी सोमय्यांना दिले होते. तसेच आज, किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन रश्मी ठाकरेंवर आरोप केले होते. रश्मी ठाकरे यांनी आरटीजीएसद्वारे येथील घरपट्टी भरल्याचे त्यांनी म्हटले. त्यासंबंधीची कागदपत्रेही त्यांनी दाखवली. मात्र, या आरोपांबाबत नवी माहिती समोर आली आहे. कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला. कोर्लई येथे रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावे साडेनऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पण या ठिकाणी बंगले नाहीत. या जागेत नारळाची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या असल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले सरपंच?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, १९ बंगल्यांविषयी सोमय्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले होते. त्यात किरीट सोमय्या यांनी आज, सकाळी ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा यासंदर्भात काही आरोप केले आहेत. कोर्लईचे सरपंच मिसाळ यांनी सांगितले की, २००९ मध्ये या जागेवर १८ घरे होती. तशी नोंदणी झाली होती. अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये रिसॉर्ट बांधण्याची परवानगी मागितली होती. कच्ची घरे होती. रिसॉर्टची परवानगी त्यांना मिळाली नाही. २०११-१२ मध्ये त्यांनी तेथील घरे पाडून तिथे झाडे लावली होती. त्यानंतर २०१४ मध्ये ती जागा मनिषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांना विकली. २०१४ ते २०१९ मध्ये तिकडे कुणीही आले नाही. २०१९ रोजी वायकर यांना पत्र दिले. थकीत घरपट्टी होती, त्याबाबत नोटीस दिली. २०१९ रोजी त्यांनी त्या घरपट्टीची रक्कम जमा केली. मात्र, तिकडे गेल्यानंतर तिथे एकही घर नसताना कर आकारणी केली आहे, हे लक्षात आले. २०१९ रोजी जी घरे नावावर केली आहेत, ती १८ घरे आहेत. २०२१ पर्यंत करआकारणी केली आहे. मात्र, प्रत्यक्ष जागेवर जाऊन कर आकारणी समितीने पाहणी केली. तिथे घरे नसल्याने १८ घरांची नोंदणी रद्द केली. तसेच रश्मी ठाकरे यांनी माफीनामा मागितल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. पण त्यांनी कोणताही माफीनामा दिला नाही, असे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सांगितले.