महावीर प्लाझामध्ये जय अंबे ब्रेड पकोडा सेंटर येथे सागर नंदकिशोर साहू याच्यावर कारवाई केली आहे. या ब्रेड पकोडा सेंटरमधून सागर साहू कामोत्तेजक औषधांची अवैधपणे विक्री करत असल्याची माहिती एफडीएचे औषधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने १२ फेब्रुवारीला या ब्रेड पकोडा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून सागर साहूकडून कामोत्तेजक औषध विकत घेतले. त्यावेळी एफडीएला खात्री पटली व नंतर धाड टाकण्यात आली. त्यावेळी ब्रेड पकोडा सेंटरवरून एका प्लास्टिकच्या पोत्यात सुमारे १६ हजार रुपयांचे औषध मिळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे.
सागर साहू याच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या कामोत्तेजक औषधांची स्ट्रिप (चार गोळ्या) २० रुपयांत होलसेलमध्ये मिळत होत्या. सागर साहूला या गोळ्यांची स्ट्रिप १५ रुपयात मिळायची. दरम्यान काही अधिकृत औषध विक्रेते त्याच्याकडून २० रुपये प्रमाणे स्ट्रिप खरेदी करायचे. या स्ट्रीपवर ‘एमआरपी’ तब्बल १२७ रुपये आहे. त्यामुळे कदाचित २० रुपये किमतीच्या या स्ट्रीपची एमआरपीप्रमाणे विक्री झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. एफडीएने पाठवलेल्या डमी ग्राहकाने ४०० रुपये देऊन सागर साहूकडून २० स्ट्रिप खरेदी केल्याचे औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले आहे.
‘एफडीए’ला या ठिकाणी जप्त केलेल्या कामोत्तेजक औषधींमध्ये ‘सिल्डेनाफीड सायट्रेड’ नावाचे घटक असल्याचे त्या औषधांच्या लेबलवरून समोर आले. या घटकांचे औषध केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन द्वारेच अधिकृत औषधविक्रेते विक्री करू शकतात. असे असताना साहूकडे औषध विक्रीचा परवाना सुद्धा आढळला नाही. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: अवैध असल्याचे समोर आले. जप्त केलेला औषधी साठा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. दरम्यान सागर नंदकिशोर साहूने अवैध मार्गाने घातक औषधांची विना परवानगी विक्री केल्याचे समोर आल्यामुळे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी या प्रकरणात कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री केल्याने औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन झाले असल्याचे समोर आले. ही कारवाई औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) मनीष गोतमारे, औषध निरीक्षक स्वाती भरडे यांनी आयुक्त (औषधे) उमेश घरोटे यांचे मार्गदर्शनात केली आहे.
या गोळ्यांचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम
हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने या गोळ्यांचे सेवन केल्यास त्या व्यक्तीचा रक्तदाब झपाट्याने कमी होऊन त्याला तत्काळ हृदयरोगाचा तीव्र झटका येऊ शकतो. तसेच ही गोळी एखाद्या व्यक्तीने एक, दोनदा सेवन केल्यास त्याला या गोळीच्या सतत सेवनाची सवय लागण्याची दाट शक्यता आहे, असे औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले आहे.