कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा कर्मचारी तानाजी माणू शेळके (वय वर्षे २७) या तरुणावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केलं आहे. गायरानातील पाणी टाकीत किती पाणी उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी शेळके मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गेले असता अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. (Kolhapur News Update)

हल्ल्यात शेळके यांच्या डाव्या खांद्याला नखांचे ओरखडे व जखमा झाल्या आहेत. त्यानंतर प्रसंगावधान राखत शेळके चपळाईने काजुच्या झाडावर चढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तरीही अस्वलाने तीनवेळा येऊन शेळके यांच्यावर हल्ला केला. पण शेळके यांनी बचाव केला. अस्वलाने चिडून झाडांची साल ओरखडून चावली आहे. शेळके यांनी आरडाओरडा करत मदतीसाठी गावकऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने अस्वल निघून गेले. आरडाओरड ऐकून काही गावकरी झाडाजवळ आले. त्यांनी शेळके यांना झाडाखाली उतरवले. तसंच अस्वल परत येऊ नये म्हणून झाडाखाली पालापाचोळा पेटवून दिला.

coronavirus india मोठी बातमी : केंद्राचे राज्यांना पत्र; म्हटले, ‘करोना संसर्गात लागू केलेले निर्बंध…’

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या गाडीने तानाजी शेळके यांना ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे उपचारास दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याकामी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी.आर.भांडकोळी, वनपाल एन.एम. धामणकर, वनरक्षक प्रकाश शिंदे, मेघराज हुल्ले, डी.एस रावळेवाड, वनमजूर नारायण गावडे, पी.एन.नागुर्डेकर, विश्वनाथ नार्वेकर उपस्थित होते.

दरम्यान, वनक्षेत्रात गुरे चारायला जाताना किंवा वनक्षेत्रानजीक शेतात वावरताना स्थानिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन वनक्षेत्रपाल पाटील यांनी केलं आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here