पुणे : शहरातील गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी तसंच माजी नगरसेविका जयश्री मारणे यांचा पक्षप्रवेश बुधवारी केला. कोथरूडमध्ये या दोन गँगस्टरच्या पत्नी आगामी महापालिका निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या तर शहरातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Gajanan Marane Wife Joins NCP)

जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्या महापालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत कोथरूडमधून निवडून आल्या होत्या. गजा मारणे हा ‘मकोका’च्या गुन्ह्यात यापूर्वी अटक होता. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे. निवडणुकांचा कालावधी जवळ आला की गँगस्टरला सुगीचे दिवस येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मोहोळ याने आपल्या पत्नीच्या रुपाने महापालिकेच्या सत्तावर्तुळात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

बंद कारमध्ये नग्न अवस्थेत आढळला कपलचा मृतदेह; परिसरात उडाली खळबळ

मोहोळ या भाजपकडून भुसारी कॉलनी-सुतारदरा या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे. मोहोळ यांना रोखण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने मारणे यांना रिंगण्यात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मारणे यांचा रितसर पक्ष प्रवेशही ‘राष्ट्रवादी’ने केला आहे. शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली होती. आता दोन्ही पक्षांमध्ये एक गँगस्टर सक्रिय होणार असल्याने कोण कोणावर टीका करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

molestation: ‘तो’ लहान मुलीचा विनयभंग करून पळून जात होता; अखेर झाला गजाआड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीपक मानकर, बाबुराव चांदेरे, बंडू केमसे, सुभाष जगताप, रुपाली ठोंबरे व अभय मांढरे यांच्या उपस्थितीत मारणे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. मारणे या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून ‘राष्ट्रवादी’च्या परिवारात दाखल झाल्याची प्रतिक्रिया जगताप यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मारणे आणि मोहोळ हे कुख्यात गुंड असून त्यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहोळ हा येरवडा तुरुंगात असताना त्याने कातिल सिद्दिकी या दहशतवाद्याचा खून केल्याचा गुन्हा होता. या गुन्ह्यात त्याची निर्दोष सुटका झाली असून इतर गुन्ह्यांत तो जामिनावर आहे. मारणे हा वर्षभरापूर्वी तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने जोरदार रॅली काढली होती. या रॅलीनंतर त्याच्यावर जवळपास तीन ‘मकोका’ गुन्हे दाखल झाले असून त्याची रवानगी पुन्हा जेलमध्ये करण्यात आली. त्याच्यावर सध्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्हीही गँगस्टर महापालिका निवडणुकीच्या रुपाने समोरासमोर आले तर कोथरूडमधील शांतता भंग होण्याची शक्यता असून पोलिसांपुढील डोकेदुखी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here