यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, जलसंपदा, महापारेशन आणि महाजनकोचे ऑडिट करा. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सहा विद्युत प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. खासगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे हे आता कळलं पाहिजे. खासगी कंपन्यांची वीज खपण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारी वीज प्रकल्प बंद पाडले जात आहेत. बंद पडलेले वीज प्रकल्प घेणाऱ्या खासगी कंपन्या या राज्यातील प्रमुख नेत्यांच्याच आहेत. विजेचे जे बोके आहेत त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
राज्यात प्रमुख पक्षांमध्ये सध्या सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप म्हणजे, जनतेच्या प्रमुख प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय नेत्यांसारख्या वागत आहेत. विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी अशा लोकांची चौकशी करण्याऐवजी कुणी-कुणाच्या लग्नात काय दिले? मंडप डेकोरेटरने काय केले? एवढ्या खालच्या पातळीवर तपास यंत्रणा पोहोचल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.