म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः क्लीनअप मार्शलमार्फत नागरिकांकडून सुरू असलेल्या ‘वसुली’ची आपण गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महापौर यांनी दिले आहे. खासगी गाडीतून प्रवास करणाऱ्याकुटुंबीयांना मास्क सक्तीचे नाहीत, अशी घोषणा करीत, अशा प्रवाशांवर कारवाई करू नये, असे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.

विनामास्क नागरिकांना २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र, क्लीनअप मार्शलमार्फत ठिकठिकाणी नागरिकांकडून विनापावती ‘चिरीमिरी’ घेतली जाते. तसेच पाणी पिण्यासाठी मास्क खाली घेतला असल्यासही दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबतचे १६ फेब्रुवारीच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची गंभीर दखल महापौरांनी घेतली आहे.

विनापावती ‘वसुली’ करणाऱ्या, तसेच नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या मार्शलच्या विरोधात पालिकेने दिलेल्या १८००२२१९१६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. मार्शलना गणवेश देण्यात आला असून, त्यावर त्याचा अनुक्रमांक व विभागाची नोंद करण्यात आली आहे. तक्रार करताना या दोन्ही बाबींची माहिती संबंधितांनी द्यावी. विनामास्क कारवाईबाबत डिजिटल पावतीची प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. लवकरच ते सेवेत येतील, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

किशोर कदम यांच्याकडून माहिती घेणार
अभिनेते किशोर कदम यांनी अंधेरी पूर्व आणि इतर ठिकाणी खासगी गाड्यांमधून वा रस्त्यावरून चाललेल्या कुठल्याही माणसाला धरून तोंडावर मास्क असून, तो नाकाच्या वर नव्हता असे सांगत छायाचित्रे काढून पैसे उकळत आहेत, अशी माहिती आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. तसेच हा ‘टॉर्चर’ करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. याचीही दखल आपण घेतली असल्याचे महापौरांनी सांगितले. कदम यांच्याशी संपर्क करून त्यांना आलेल्या अनुभवाची माहिती आपण घेणार आहोत, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here