शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच, भाजपच्या नेत्यांवर आरोप केले होते. राऊत यांच्या आरोपांनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आरोप केले. तर काल, नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. नारायण राणेंच्या याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी लगेच खासदार विनायक राऊत यांनीही पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे आणि नितेश राणे यांचे जुने व्हिडिओ दाखवले होते. त्यात नितेश राणे हे किरीट सोमय्या यांच्यावर, तर नारायण राणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत होते. विनायक राऊत यांनी राणे पिता-पुत्रावर त्यांच्या जुन्या व्हिडिओंच्या माध्यमातून टीका केली असतानाच, हाच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. ‘विनायक राऊत यांच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही आदर किंवा सहानुभूती नाही. पण आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, ती अतिशय योग्य होती. सोमय्यांचे राणेंवर केलेले आरोप कुठे गेले? त्यानंतर नारायण राणे यांनी मोदींवर केलेली टीका आणि नितेश राणे यांचे व्हिडिओ आपल्याला त्यांचे खरे रंग दाखवते. एका माळेचे मणी’ असे दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.