खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन, किरीट सोमय्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. तर, या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी ट्विट करून, त्यांनी किरीट सोमय्यांना इशारा दिला होता. बाप-बेटे जेलमध्ये जाणार, वेट अँड वॉच!, कोठडीचे सॅनिटायजेशन सुरू आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याशी संबंधित घोटाळ्याचे पुरावे ते सादर करतील का? आणि दोघांविरोधात कारवाई होणार का, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत होते. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांचे पीएमसी घोटाळ्यातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
या संबंधित कागदपत्रे आणि पुरावे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, आपले पीएमसी घोटाळ्यातील आरोपीशी काहीही संबंध नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राऊत यांच्या इशाऱ्यानंतर किरीट सोमय्या आणि नील यांच्याविरोधात तपास चक्रे फिरतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याचवेळी आज, गुरुवारी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी तिथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. संजय राऊत हे किरीट सोमय्यांशी संबंधित काही कागदपत्रे मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे कळते. त्यांच्यातील बैठकीत याबाबत काही चर्चा होणार का? सोमय्या यांच्याविरोधात काही कारवाईचे निर्देश दिले जाणार का? अशी वेगवेगळी चर्चा आता सुरू झाली आहे.