पुणे -बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना वळणाच्या रस्त्यावर प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने मागील गाडी या गाडीवर जाऊन धडकली. दरेकर यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या या गाड्या होत्या. अपघातात दोन्ही गाड्यांचं किरकोळ नुकसान झालं आहे. अपघात झाल्यानंतर दरेकर हे स्वत:च्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहनांमधील व्यक्तींची चौकशी केली.
या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर हे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी कोल्हापूरकडे मार्गस्थ झाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही काळापासून रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांच्या गाड्यांनाही वारंवार अपघात होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे वाहन चालवताना रस्ते वाहतुकीच्या इतर नियमांसह वेगमर्यादेचंही पालन होण्याची गरज अधोरेखित होत आहे.