अहमदनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षाने आता राज्यातील ५ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. या मतदारसंघांत पक्षसंघटन वाढवण्याचं काम पक्षाने सोपवलं असून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा यापूर्वी अनेकदा झाल्या. मात्र अद्याप मंत्रिपद मिळालं नसलं तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांप्रमाणे त्यांच्याकडे आता पक्षविस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Mla Rohit Pawar)

रोहित पवारांवर ज्या मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते पाचही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघासोबत श्रीगोंदा, उस्मानाबाद, भूम-परांडा, करमाळा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पवार यांच्यावर सोपवली. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपवली असून पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास रोहित पवार यांनी ट्वीट करून व्यक्त केला आहे.

प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघात

रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून हिसकावला आहे. त्यानंतर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अन्य माध्यमातून रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचा जम बसवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात पक्षाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आमदार आहेत. करमाळ्यात संजय शिंदे हे अपक्ष आमदार आहेत. तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे भारत भालके विजयी झाले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने ही जागा राष्ट्रवादीकडून खेचून घेतली. भाजपचे समाधान आवताडे तेथून विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीला हा पराभव जिव्हारी लागलेला आहे.

उस्मानाबाद आणि भूम-परांडा येथे शिवसेनेचे आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झालेली आहे. पवारांचे निकवर्तीय माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराने राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पवार कुटुंबीयांना जिव्हारी लागले होते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने विविध कारणांमुळे महत्त्वाच्या असलेल्या मतदारसंघांची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपवली आहे. आमदार झाल्यापासून पवार यांनी मुंबईतील मंत्रालयात जम बसवणे आणि राज्यभरात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या संपर्काचा आणि कामाच्या धडाक्याचा पक्षाने पुढील निवडणुकीत फायदा करून घेण्याचं ठरवल्याचं दिसत आहे. त्यामुळे हळूहळू रोहित पवार यांच्याकडे मोठमोठ्या जबाबदाऱ्या येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here