अहमदनगर : सुपर मार्केटमधून वाइन विक्रीला परवानगी देण्यावरून राज्यात वादंग निर्माण झालं आहे. काहींनी देशी दारू आणि गावठी दारूकडेही या निमित्ताने लक्ष वेधलं आहे. ही चर्चा सुरू असतानाच अहमदनगर पोलिसांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे. तेथून सुमारे एक लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. (Ahmednagar Crime Latest News)

गावठी दारूला बंदी असूनही नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हातभट्या लावून अशी दारू गाळली जाते. काही गावे आणि परिसर यासाठी कुप्रसिद्धही आहेत. पोलिसांकडून अधून-मधून कारवाई केली जाते. कधी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही छापेमारी होते. सध्या राज्य सरकारच्या वाइनसंबंधीच्या निर्णयामुळे दारू हा विषय चर्चेत आहे. अशातच पोलिसांनी उत्तर नगर जिल्ह्यात प्रवरा नदीच्या काठावर मोठी कारवाई केली आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

भाजपच्या कोअर टीमच्या बैठकीत राडा, महिला जिल्हाध्यक्षांची शिवीगाळ, बाटल्या भिरकावल्याचा आरोप

देवळाली प्रवरा येथे परिसरातील हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला. बापू गायकवाड (रा. देवळाली प्रवरा), सोमनाथ बर्डे, रमेश गायकवाड, आशाबाई बाळासाहेब गायकवाड, वैभव गायकवाड, ज्ञानेश्वर रामकिसन भागवत यांच्या गावठी दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या अवैध व्यवसायांकडे दुर्लक्ष होत होते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे त्यांची मोठी धावपळ उडाली. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या गावठी दारू गाळली जाते, तिची वाहतूक आणि विक्रीही केली जाते. किराणा दुकानातून वाइन विक्रीला विरोध आणि पाठिंबा याची चर्चा सुरू असताना या अवैध दारूकडे मात्र दुर्लक्ष होते. आता पोलिसांनी सुरू केलेली ही कारवाई सर्वत्र करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here