‘राज्यात तुमचंच सरकार आहे, त्यामुळे अमोल काळे यांच्यासह अनेकांवर आरोप करण्यापेक्षा गुन्हा दाखल करून कारवाई करा,’ असं आवाहन करतानाच हम कर सो कायदा यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. दरम्यान, काळे, किरीट सोमय्या, मोहित कंबोज हेसुद्धा अब्रुनुकसानीचे दावे दाखल करतील. त्यांच्या सुनावणीला हेलपाटे घालून तुम्ही मरून जाल, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक मंत्री तुरुंगात गेले. तेव्हा त्यांना मदत करण्याऐवजी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी चार हात लांब राहणे पसंत केले. हीच त्यांची संस्कृती आहे. पण आमच्या पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही खंबीरपणे त्यांच्या मागे ताकद उभी करू. ही भाजपची संस्कृती आहे.
दरम्यान, सर्व प्रकरणे गळ्याशी आल्यानंतरच शिवसेनेला सारे कसे आठवते? २७ महिन्याची सत्ता असताना तुम्ही कारवाई का केली नाही, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केली. राऊत यांनी पत्रकार बैठकीत जी भाषा, जे शब्द वापरले ते पाहता राजकीय पातळी घसरल्याचं लक्षात येतं, असंही पाटील म्हणाले.