: करोनाशी लढा देण्यात पिंपरी चिंचवडने मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या १२ पैकी ११ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. ११ व्या रुग्णाचीही दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फिलिपिन्समधून आलेला हा रुग्ण करोनाबाधित असल्याचं १८ मार्च रोजी स्पष्ट झालं होतं. शहरात सध्या दिल्लीतून तबलिघीच्या कार्यक्रमातून आलेले २ आणि पहिल्या रुग्णांपैकी १ असे तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचे पहिले तीन रुग्ण १२ मार्च रोजी आढळले होते, ज्यांना २७ मार्चपर्यंत ठणठणीत बरं करण्यात आलं. तर २८ मार्चला आणखी सहा रुग्ण बरे झाले होते. पिंपरी चिंचवडने करोनावर यशस्वीपणे मात केल्याचं दिसत असतानाच दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेले दोन जण करोनाबाधित असल्याचं आढळून आलं.

पिंपरी चिंचवडसाठी दिलासादायक बातमी

संशयित म्हणून महापालिकेच्या रुग्णालयात असलेल्या ३५ पैकी ३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यातील एकाचा आणि दिल्लीहून आलेल्या अति जवळून संपर्कातील सहा जणांचे रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. करोना संशयितांना गुरुवारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या सर्वांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते.

पुण्यातही दोन रुग्णांना डिस्चार्ज

पुणे शहरातील नायडू रुग्णालयासह एका खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या दोन्ही महिला ‘करोना’मुक्त झाल्या आहेत. त्यापैकी नायडू रुग्णालयामधील महिला बरी झाल्याने त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. तर खासगी रुग्णालयातील महिला अशक्त असल्याने पुढील आठवड्यात त्यांना घरी सोडण्यात येईल. ‘करोना’च्या संसर्गाचे रुग्ण आता बरे होऊन घरी जात असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुणे शहरात आणखी तिघांना लागण झाल्याने शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा येथील एकूण रुग्णांची संख्या ५१ झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here