मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची पुनर्रचना करण्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या प्रक्रियेचे भवितव्य काय, याचा निर्णय आता सोमवार, २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी पुनर्रचनेविषयी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबत हरकती व सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेच्या वैधतेविषयी न्या. अमजद सय्यद व न्या. अभय अहूजा यांचे खंडपीठ त्यादिवशी आपला निर्णय सुनावणार आहेत.
भाजपचे नितेश सिंह व मनसेचे सागर देवरे यांनी अॅड. विवेक शुक्ला यांच्यामार्फत याविषयी याचिका केली आहे. ‘पुरर्रचनेविषयीची अधिसूचना स्वतंत्र व तटस्थ अधिकाऱ्यामार्फत प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. चहल हे राज्य सरकारचे अधिकारी असल्याने ते स्वतंत्र ठरत नाहीत. शिवाय पालिकेचा कार्यकाळ संपण्याआधीच्या सहा महिन्यांत पुनर्रचना करण्यास मज्जाव आहे. त्यामुळे ही प्रक्रियाच बेकायदा आहे’, असा युक्तिवाद याचिकादारांतर्फे करण्यात आला होता. पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची मोठी फसवणूक; पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल मात्र, या युक्तिवादात काहीच तथ्य नसल्याचे म्हणणे मांडत याचिका दंडासहित फेटाळण्याची विनंती निवडणूक आयोगातर्फे अॅड. सचिंद्र शेट्ये यांनी केली होती. महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनीही याचिका निरर्थक असल्याचा दावा केला होता. त्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवत गुरुवारी जाहीर करणार असल्याचे म्हटले होत. मात्र, ‘याविषयी आम्हाला आयोगाकडून काही बाबींची स्पष्टता करून घ्यायची आहे. त्यामुळे सोमवारी योग्य तो निर्णय देऊ’, असे खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले.