मुंबई : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असताना केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल दाखल एफआयआरविरोधात भाजप नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे याविषयी पुणे पोलिस व तक्रारदार रुपाली चाकणकर यांना म्हणणे मांडण्याची संधी देत न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा झाला होता. या कार्यक्रमानंतरच्या काही दिवसांतच सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. ‘सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवरच दरेकर यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य करून त्यांनी महिलांचा अपमान केला. तसेच, महिलांच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा’, अशी तक्रार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्यावर सिंहगड पोलिसांनी दरेकर यांच्याविरोधात भादंविच्या कलम ५०९ अन्वये (महिलेच्या विनयशीलतेचा भंग करणारे उद्गार काढणे, हावभाव करणे किंवा कृत्य करणे) एफआयआर दाखल केला.

मुंबईतील प्रभाग पुनर्रचनेचे काय होणार?

मात्र, ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून हा एफआयआर हेतूपुरस्सर व राजकीय हेतूने करण्यात आला आहे’, असा दावा करत दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यांनी याचिकेत राज्य सरकार व पुणे पोलिसांबरोबरच रुपाली चाकणकर यांनाही प्रतिवादी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here