सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात एकच करोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला होता. त्याच्या करोना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून हा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा करोनामुक्त झाला आहे.

संबंधित करोनाबाधीत व्यक्तीने १९ मार्च रोजी मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास केला होता. हा व्यक्ती ज्या डब्यात होता त्याच डब्यात करोना पॉझिटिव्ह रुग्ण होता. दरम्यान, कोकण रेल्वेने तत्परतेने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला तसे कळवले होते. नंतर जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात अलगीकरण कक्षात ठेवले होते. या व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या रुग्णावर आवश्यक सर्व उपचार करण्यात येत होते. या उपाचारांती हा रुग्ण आता बरा झाला आहे. या रुग्णाच्या दुसऱ्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी सांगितले.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून जिल्ह्यात पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावोगावी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस काटेकोरपणे कार्यरत आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस नाक्यांची पाहणी करून पोलिसांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी प्रथमच जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर ही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. ती त्यांनी तडफेने हाताळली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here