राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. अंत्यत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला धूळ चारत शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिठ्ठीने एक जागा भाजपला मिळाली होती. तसंच राष्ट्रवादीला ७ जागांवर विजय मिळवण्यात यश आलं होतं.
भाजपची सेनेला साथ
बोदवड नगरपंचायतीत सुरूवातीपासूनच भाजप-सेनेची छुपी युती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यातच आता बोदवड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेचा हात धरल्यामुळे खडसेंच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. राज्यात जरी भाजप आणि शिवसेना हे पक्ष विरोधात असले तरी जळगावातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीने निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेसोबत जाणं पसंत केलं आहे. भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत!
नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, बोदवडकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे तो विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवणार आहे. बोदवडच्या विकासासाठीच भाजप शिवसेनेसोबत आली आहे. जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये भाजप-सेना सोबत राहील का? याबाबत विचारले असता त्यांनी भाजपची भूमिका भाजपला विचारा, ते तयार असतील तर आम्ही तयार असल्याचं ते म्हणाले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजप-सेनेची युती होऊन राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, भाजपचे विजयी उमेदवार विजय बडगुजर यांना विचारलं असता त्यांनी बोदवड शहराच्या विकासासाठी शिवसेनेसोबत गेल्याचं सांगितलं आहे.