जळगाव जिल्हा परिषदेची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने आघाडी घेत आज शुक्रवारी पक्षाच्या बैठकीत जिल्हा परिषदेत ४० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. आज झालेल्या बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले की, या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होणार आहे. त्यामुळे मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजप स्वबळावर लढणार आहे. ४० पेक्षा एकही जागा कमी होऊ देवू नका. जळगाव आपला बालेकिल्ला आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. २३ दिवसात आपल्या गटात, गणात कामाला लागून मेळावे घ्यावे लागणार आहेत. काहीही करून या निवडणुका जिंकाव्यात, असं आवाहन देखील महाजन यांनी केले.
महाजनांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल
महाविकास आघाडी सरकारचे काम गिनीज बुकमध्य नोंद करण्यासारखे आहे, अशी टीका महाजन यांनी केली. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचे हे सरकार आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात सर्वांचे तीन तेरा वाजले आहेत. ही सर्व परिस्थिती लोकांपर्यंत पोहचवा, सरकारला सळो की पळो करुन सोडा, आरक्षणाची प्रतिक्षा न करता उद्यापासूनच कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. संजय राऊत यांना टीव्हीवर येण्याशिवाय काम नाही. ते बेछूट बोलत आहेत. त्यांचा स्वतः वरचा ताबा सुटला आहे. सर्व जण उघडे पडल्याने सरकार अडचणीत आलं आहे. या सरकारचं काही खरं नाही, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.