सांगली जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री असे दिग्गज मंत्री असतानाही शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी दिलेली नाही. कारखानदारांनी एफआरपीच्या कायद्याची पायमल्ली केली आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
विश्रामबाग चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरवात झाली. काही अंतरावर मोर्चा आल्यानंतर आंदोलक साखर कारखानदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह मोर्चात सहभागी झाले.
आंदोलकांकडून साखर कारखानदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना जोरदार विरोध केल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अचानक झालेल्या या प्रकाराने मोर्चात गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी बाळाचा वापर करत प्रतिकात्मक पुतळा काढून घेतला. पोलिसांनी केलेल्या बळजबरीवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री जयंत पाटील यांचा निषेध नोंदवला. तसेच उसाला एकरकमी एफआरपी न देणाऱ्या साखर कारखानदारांवर टीकेची झोड उठवली. सांगली जिल्ह्यातील खाजगी साखर कारखाना एफआरपी देऊ शकतो, मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी एफआरपी देण्यास टाळाटाळ करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.