आग विझवताना अग्निशमन दलातील अधिकारी विजय पवार यांच्यासह चौघे किरकोळ जखमी झाले. फायरमन रामचंद्र चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून ते २५ टक्के भाजले आहेत. स्फोटाचे कारण समजू शकलेलं नाही. शांतिनिकेतन कॉलेजच्या शेजारी मेंडगुळे वस्तीत असलेल्या झोपडपट्टीत नंदकुमार जावीर यांच्या घरात गॅसची गळती होऊन स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत चार घरांनी पेट घेतला.
आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. पेट घेतलेल्या चार घरांमध्ये एकूण आठ सिलिंडर होते. त्यातील सात सिलिंडर बाहेर काढण्यात आले. नंदकुमार जावीर यांच्या घराला कुलूप असल्याने त्यांच्या घरातील सिलिंडर बाहेर काढता आला नाही.
दरम्यान, त्याचवेळी जावीर यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घराचा पत्रा फोडून सिलिंडर बाहेर फेकला गेला. यावेळी आग विझवणारे अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार, फायरमन रामचंद्र चव्हाण, सुनील माळी हे जखमी झाले. या स्फोटात परिसरातील काही नागरिकही किरकोळ जखमी झाले.