आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीतील आम्ही तरुण मंत्री ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या विकासाच्या संकल्पना राबवत आहोत. कोविडमुळे यात व्यत्यय आला होता. मात्र, त्यावर मात करून आम्ही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कोविडमुळे प्रत्यक्ष सभा घेण्यावरही बंधने आली. आता मात्र वातावरण निवळत आहे. आता खऱ्या अर्थाने काम सुरू होईल. नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्हाला ताकद द्या, अशीच प्रार्थना आज मी साईबाबांकडे केली आहे. राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी ताकद मिळावी, अशी मागणी मी केली आहे. शंकरराव गडाख आमच्यासोबत आले तेव्हा सरकार कोणाचे येणार याची काहीच खात्री नव्हती. तरीही ते विश्वासाने आमच्यासोबत आले. त्यामुळे जेव्हा सरकार आले, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडाखांना मंत्री म्हणून संधी दिली, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी भाजपचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मागील सरकारच्या काळात राज्यात मोठे प्रदूषण झाले होते. त्या प्रदूषणमुक्तीचे काम सध्या सुरू आहे. आपण सर्वांनी सोबत मिळून राज्यात प्रदूषण करणाऱ्यांना आपण दूर ठेवले आहे. प्रदूषणाचे नाव घ्यायचे नसते. तुम्हीच सांगा कोण प्रदूषण करत आहे. खालच्या पातळीवर जाऊन ते लोक टीका करत आहेत. राजकारणाची पातळी त्यांनी खाली आणली आहे. मात्र आम्ही महाविकास आघाडी म्हणून भक्कमपणे काम करत आहोत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जनतेची कामे करण्यासाठी सुरुवात केली. सामान्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. आम्हाला राजकारणावर नव्हे तर समाजकारणावर भर द्यायचा आहे,’ असं ठाकरे म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे यांचीही भाषणे झाली. युवा नेते उदयनराजे गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, सोनईत येण्यापूर्वी ठाकरे यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त राहुल कनाल, अनुराधा आदिक, अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके व उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.