मुंबई : ‘कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा ठरावाप्रमाणे जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले. जागतिक दहशतवादी म्हणून झाल्याचा गैरफायदा घेत त्याचा भाऊ इक्बाल कासकरने अनेक बिल्डर व सेलिब्रिटी व्यक्तींकडून खंडण्या उकळल्या,’ असे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर न्यायालयाने इक्बालला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली. त्यामुळे दाऊदकडून येणारा अवैध पैसा व हवालामार्गे होणारे आर्थिक व्यवहार इत्यादीविषयी ईडीचे अधिकारी इक्बालची कसून चौकशी करणार आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाऊद इब्राहिम व अन्य काहींविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा नोंदवला आहे. शिवाय इक्बाल कासकरने मुंबई व ठाणे परिसरात दाऊदची भीती दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळण्यासह मालमत्ताही हडप केल्या आहेत. त्यामुळे त्याआधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने दाऊदच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या ठिकाणांवर छापेही टाकले. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीने न्यायालयाच्या परवानगीने इक्बालला ठाणे तुरुंगातून ताब्यात घेतले आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली अटक दाखवून शुक्रवारी न्या. एम. जी. देशपांडे यांच्यासमोर हजर केले. ‘ईडी’तर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी अर्जाद्वारे सर्व तपशील न्यायालयासमोर मांडला.