मुंबई: राज्यात करोनाने थैमान घातलेलं असतानाही जीवमुठीत घेऊन कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलिसांबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावत असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्तवपूर्ण बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करोनाची साथ पसरलेली असताना पोलीस जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशावेळी एखाद्या पोलिसाचा करोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात करोना रुग्णांची संख्या ४१६ वर गेली आहे. काल दिवसभरात राज्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होत असले तरी संसर्गाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here