मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईच्या जुहू परिसरातील बंगला वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई महानगरपालिकेने नुकतीच या बंगल्यासंदर्भात नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. आता सोमवारी पुन्हा एकदा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जुहूतील या बंगल्याची पाहणी होण्याची शक्यता आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून या बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी उत्तर देऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे आता या बंगल्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद रंगणार का, हे पाहावे लागेल. यापूर्वी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेकडून नारायण राणे यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये बंगल्याची पाहणी आणि मोजणी करायची असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे आता बंगल्याची पाहणी झाल्यास काही नवा वाद उद्भवणार का, हे पाहावे लागेल. (BMC may take action against BJP union minister Narayan Rane bunglow in Juhu in Mumbai)
Narayan Rane claims: मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार; नारायण राणे यांचा खळबळजनक दावा

नारायण राणेंच्या बंगल्याला नोटीस का?

मुंबई महापालिकेच्या के वेस्ट वॉर्ड (अंधेरी वेस्ट) द्वारे वॉर्ड अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस राणे यांना पाठवण्यात आली आहे. एमएमसी अॅक्ट अंतर्गत सेक्शन ४८८ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. के-वेस्ट वॉर्ड आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक शुक्रवारी जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्यावर येऊन तपासणी आणि बेकायदा बांधकामाबाबत मिळालेल्या तक्रारीची खात्री करून घेणार आहेत, असे या नोटिशीत म्हटले आहे. बंगल्याच्या बांधकामासंदर्भातील कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे. राणेंच्या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने दौंडकर यांनी पुन्हा महापालिका प्रशासनाला यासंदर्भात स्मरणपत्र पाठवले. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here