रत्नागिरी: महाराष्ट्र सरकारचे करोना विषाणूच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नासाठी नरेंद्र महाराज संस्थाननेदेखील आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थानने ५० लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात नरेंद्र महाराज संस्थान नेहमीच आपली सेवाकार्याची जबाबदारी पार पाडीत आले आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशावेळी संस्थानने आपली सामाजिक बांधिलकी समजून पुढाकार घेतला आहे. त्याप्रमाणे आताही करोनाचे संकट जगभर थैमान घालत असताना महाराष्ट्र सरकारच्या करोनामुक्ती लढयाला बळ देण्यासाठी संस्थानने ५० लाख रूपयांची देणगी दिली आहे. नरेंद्र महाराज यांनी हा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी केली आहे. सध्या देश व महाराष्ट्र करोना संकटाशी लढा देत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर मात करण्याकरता आर्थिक सहाय्याचे आवाहन कले आहे. त्यात आपलाही वाटा असावा म्हणून नरेंद्र महाराज संस्थानने ५० लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. त्याचा धनादेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भकडवाड, संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर, रत्नागिरी पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी पुरूषोत्तम सुर्वे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतनिधीसाठी संस्थानचे आभार मानले.

महापुरातही दिला मदतीचा हात

राज्यात वा शेजारच्या राज्यात ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या त्या वेळी संस्थानने मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळ पडला की अनेक गावात चाऱ्याचे वाटप करण्यात येते. शेतकऱ्यांनाही थेट आर्थिक मदत केली जाते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना अर्थसहाय्य करण्यात येते. यंदा पावसाळयात सांगली व कोल्हापूर जिल्हयात पावसाने हाहाकार उडवला होता. महापुरात अनेक शेतकऱ्यांची घरेदारे वाहून गेली होती. शेती उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी संस्थानने नदयाकाठच्या गावांत ११०० टन चाऱ्याचे वाटप केले याशिवाय शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here