पाकिस्तानचे माजी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी देणं ही पाकिस्तान तहरीक ए इन्साफ सरकारची सर्वात मोठी चूक ठरल्याचं वक्तव्य पंतप्रधान इम्रान खान यांनी केलंय. ७२ वर्षीय नवाझ शरीफ सध्या लंडनमध्ये असून त्यांच्यावर नोव्हेंबर २०१९ पासून उपचार सुरू आहेत.
स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (PML-N) अध्यक्ष नवाझ शरीफ यांना इतर आजारांव्यतिरिक्त हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतंय.
इम्रान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन इथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
शरीफ यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचा संदर्भ देताना ‘शरीफ एक दिवसही जगू शकणार नाहीत असं आपल्या सरकारला वाटत होतं. पण, मी आज कबूल करतो की नवाजला परदेशात जाण्याची परवानगी देऊन आम्ही सर्वात मोठी चूक केली’ असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं.
पाकिस्तानात इम्रान खान यांच्या लोकप्रियतेत घसरण
विरोधकांच्या टीकेला प्रत्यूत्तर देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून इम्रान खान यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. विरोधकांकडून पंतप्रधानांविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणून सत्तेवरून हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
देशातील एका सर्वेक्षणानुसार, देशात अनेक भागांत इम्रान खान यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाल्याचं दिसून आलंय. त्यानंतर खवळलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्ला चढवलाय.
इम्रान खान फेब्रुवारी महिन्यात रशियाला भेट देऊ शकतात. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इम्रान यांचा रशिया दौरा पुढे ढकलण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.