काही दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना विनायक राऊत यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले होते. हा आरोप-प्रत्यारोपांचा ‘सिलसिला’ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज, शनिवारी शिवसेना खासदार विनायक राऊत, महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी पुन्हा राणेंवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप करतानाच, इशाराही दिला. राणे यांनी आमच्यावर आरोप केले. ते निराधार आहेत. पण त्यांच्या आरोपांची दखल घ्यावीशी वाटत नाही. राणे यांना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, पण मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना आठवण नसेल, पण मला भूतकाळ सांगावा लागेल. सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षांत अनेक घटना घडल्या. मारामाऱ्या, खंडणी उकळण्यात आली. मंचेकर, गोवेकर, भिसे यांच्या निर्घृणपणे हत्या झाल्या. या हत्याच्या घटना कुणी पचवल्या, असा सवालही राऊत यांनी केला. सिंधुदुर्गात ज्या राजकीय हत्या झाल्या आहेत, त्याबाबत आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असून, चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असे राऊत यांनी सांगितले.
ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरली?
मातोश्रीवरील चार जणांविरोधात ईडीकडून नोटिसा तयार आहेत, असा इशारा राणे यांनी दिला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून धमकी देणे हे पदाचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. एकतर ईडीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली असेल, किंवा ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरली असेल, अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली. याबाबत आपण लोकसभेत आवाज उठवणार असून, पंतप्रधानांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी राऊत यांनी व्हिडिओही दाखवला. त्यात राणेंवर देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्यावर काय-काय आरोप केले होते, ते दाखवण्यात आले.