अंगडियांचे व्यवहार हे रोखीने चालत असून मुंबादेवी परिसरात त्यांची अनेक कार्यालये आहेत. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व्यवसाय करू देत नसून चौकशीच्या नावाखाली त्रास देतात. तसेच रोखीच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला देण्याची धमकी देऊन पैसे उकळत असल्याची तक्रार मुंबादेवी येथील अंगडिया असोशिएशन यांच्या मार्फत पोलिसांकडे करण्यात आली होती.
मनसेचा स्टेज कोसळला; राज ठाकरे स्टेजवर असतानाच घडला प्रकार
या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी याबाबत अंगडिया तसेच निरिक्षक ओम वंगाटे, सहायक निरिक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्यासह त्यांच्या पथकातील इतर पोलिसांची कसून चौकशी केली. मुंबादेवीच्या पोफळवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही, पोलीस डायरीमधील नोंदी, पोलिसांचे जबाब यावरून या अधिकाऱ्यांनी बेकायदा वसुली केल्याचे दिसून आले. त्यावरून दिलीप सावंत यांच्या तक्रारीवरून हे अधिकारी कार्यरत असलेल्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कदम आणि जमदाडे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्या दोघांनाही न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.