विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुंबईतील पत्रकार परिषदेत हल्लाबोल केल्यानंतर, कोकणातून शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही राणेंना लक्ष्य केले. सिंधुदुर्गातील सात राजकीय हत्यांचा उल्लेख करतानाच, चौकशीची मागणी आपण गृहमंत्र्यांकडे करणार आहोत, असं राऊत म्हणाले होते. आता वैभव नाईक यांनीही हाच मुद्दा उपस्थित करून राणेंना एकप्रकारे इशारा दिला आहे. राणे हे खुनाच्या घटनांबद्दल अनेक दाखले देत आहेत. त्यांना खुनांच्या घटनांबद्दल अधिक माहिती आहे. माझी सरकारला विनंती आहे की, अनेक खुनाची प्रकरणे उघड करता येतील. अंकुश राणे, मंचेकर, रमेश गोवेकर ही सर्व प्रकरणे सरकारने उघडली पाहिजेत. त्यांच्या मागे कोण आहे याचा तपास केला पाहिजे, अशी माझी सरकारकडे मागणी आहे, असेही नाईक म्हणाले.
‘राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत’
वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर यावेळी हल्लाबोल केला. राणे हे केंद्रीय मंत्री झाल्यापासून गेल्या वर्षभरात त्यांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केली होती. पण शिवसेनेचे ते काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक होऊन पोलीस कोठडी झाली. त्यामुळे राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. शिवसेनेवर आता ते बेछुट आरोप करत आहेत, अशी टीका नाईक यांनी यावेळी केली. नारायण राणेंच्या बंगल्यातील काम नियमात झाले असेल तर, कारवाई होणार नाही. मुबई महानगरपालिकेकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. असेही त्यांनी सांगितले. सुशांतसिंग प्रकरणात सीबीआयने राणेंना बोलवून घ्यायला हवं, जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर, ते घेऊन सीबीआयने कारवाई करावी. राणे दिल्लीत असतात. त्यांनी सीबीआय कार्यलयात जाऊन नावं द्यावीत, असेही नाईक म्हणाले. राणेंकडे जर कोणाचे कारनामे असतील तर त्यांनी बाहेर काढावेत. फुकटच्या वल्गना करू नयेत. फुकटची धमकी देऊ नका. काल राणेंनी सांगितलं, ईडीची नोटीस येणार आहे. आज नोटीस कुठे गेली? आज दुसराच विषय त्यांनी घेतला. लोकांमध्ये चर्चेत येण्यासाठी राणे काहीतरी आरोप करत आहेत, असंही नाईक म्हणाले.
शिवसेना हा मराठी माणसांसाठीचा पक्ष आहे. आज राणे कोणाची चापलुसगिरी करत आहेत? किरीट सोमय्या व लोढांसारख्या मुंबईतील माणसांची राणे बाजू घेत आहेत. मराठीद्वेष्ट्यांची ते बाजू घेत आहेत. त्यामुळे राणेंना मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार राहिला नाही, असेही नाईक म्हणाले. राणेंच्या आरोपांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष देण्याची गरज नाही. अशा आरोपांकडे शिवसेनाही लक्ष देणार नाही, असेही ते म्हणाले. नितेश राणे हे कलाकार आहेत की आरोपी आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे, असा हल्लाबोल त्यांनी नितेश राणेंवर केला.