मुंबई: करोना विरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचं दर्शन घडवण्यासाठी दीप प्रज्वलित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तिमिरातून तेजाकडं नेणाऱ्या दिव्याचं महत्त्व राज्यातील नेत्यांना कळलेलं नाही, हे दुर्दैव आहे,’ असं भाजपचे आमदार यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खोचक टीका केली होती. राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून त्यांच्या टीकेचा प्रतिवाद केला आहे. ‘देश एका संकटातून जातोय. या चिंतेच्या, संघर्षाच्या परिस्थितीत संपूर्ण देश एक आहे. देशातील जनतेमध्ये एकजूट आहे. एकजुटीनं सगळे या संकटाशी लढताहेत. या अंधकारातून मार्ग काढताना एक आशेचा किरण म्हणून प्रत्येकानं प्रकाशाचा दिवा हाती घेऊन एकतेचा संदेश द्यावा, असं पंतप्रधान मोदींना अपेक्षित आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना तिमिरातून तेजाकडं नेणाऱ्या या दिव्याचं महत्त्वं कळलेलं नाही, असं राम कदम म्हणाले.

‘या संकटाच्या काळात आम्ही कोणावर आरोप करणार नाही. पण, मोदींनी महाराष्ट्रातील गोरगरिबांना मोफत धान्य दिलं. त्यातलं एक किलोही धान्य अद्याप गोरगरिबांपर्यंत पोहोचलेलं नाही. दवाखाने बंद आहेत. तिथल्या डॉक्टरांना किट द्यायलाही राज्य सरकार तयार नाही. डॉक्टरांना काळ्या बाजारातून २२०० रुपये मोजून हँडग्लोव्हज विकत घ्यावे लागताहेत. राज्यातील नेत्यांनी व मंत्र्यांनी इतर गोष्टींवर भाष्य करण्याऐवजी याकडं लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्रातील लोक उपासमारीनं मरताहेत तिकडं पाहण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षाही राम कदम यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले होते मोदी?

‘करोनाच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here