IND vs WI : कोलकाता : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा खेळाडू रोस्टन चेसने आपल्या तळहातावर काळी पट्टी बांधली होती. यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या चेसने क्षेत्ररक्षण करताना डाव्या हाताला काळी पट्टीसारखा दिसणारा टेप बांधला होता. क्षेत्ररक्षण करताना दुखापत टाळण्यासाठी खेळाडूंना बोटावर टेप लावण्याची परवानगी आहे, पण संपूर्ण तळहाताला टेप लावणे परवानगी आहे का, असा सवाल गावस्कर यांनी उपस्थित केला आहे.

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या हातावरील टेप (सौजन्य-ट्विटर)

सामन्याचे समालोचन करताना गावस्कर म्हणाले की, ‘ते काय आहे? त्याने हातमोजे घातले आहेत का? हे नियमानुसार आहे का, त्याला परवानगी आहे का? हा बार आहे का? हे नक्की काय आहे? अलीकडे हे क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहतो. बरेच क्षेत्ररक्षक अशा प्रकारचे टेप वापरतात. फक्त बोटांसाठी टेपचा वापर करणे मी समजू शकतो, पण त्याने तळहातावर टेप घातली आहे. असे केल्याने खेळाडूला क्षेत्ररक्षण करताना जास्त मदत मिळते, असेही गावस्कर यांचे म्हणणे आहे.

अशा प्रकारचे कोणतेही टेप खेळाडूंच्या तळहातावर नसावेत, असे गावस्कर यांचे मत आहे. सहकारी समालोचक आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता याबाबत म्हणाला की, ‘हे सुरक्षेसाठी आहे. जसे की तुम्ही बोटाचा उल्लेख केला, तसे करणे ठीक आहे. अनेक वेळा पॅडिंगचे विविध प्रकार दिसतात. कधीकधी हाताच्या मऊ भागाचे संरक्षण करण्यासाठी पॅडिंगची आवश्यक भासते.’

महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण सामन्यात हा टेप रोस्टन चेसच्या तळहातावर होता. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज असलेल्या चेसने सामन्यात ४ षटके टाकताना १४ धावांत २ बळी घेतले होते. कर्णधार रोहित शर्मालाही त्यानेच बाद केले होते. त्यानंतरही भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १५७ धावांपर्यंत मजल मारली होती, तर भारतीय संघाने ७ चेंडू राखत हे लक्ष्य गाठले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here