पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ लवटे आणि योगेश शिंदे हे दोघे मित्र होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. वादातून दोघांत धुसपूस सुरू होती. शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास दोघे उत्तर शिवाजीनगरमधील कॉलेज कॉर्नरजवळ असलेल्या एका कॅफेमध्ये गेले होते. त्यांच्यात पूर्ववैमनस्यातून वाद सुरू झाला आणि जोरदार वादावादीनंतर नवनाथ हा कॅफेच्या बाहेर गेला. रागातून योगेशने नवनाथचा पाठलाग सुरू केला. धावत जावून त्याने नवनाथच्या पाठीवर आणि पोटावर कोयत्याने वार केले. योगेशने नवनाथच्या अंगावर कोयत्याने आठ वार केले आणि तो घटनास्थळावरून निघून गेला.
खुनाचा प्रकार लक्षात येताच कॅफेमध्ये बसलेल्या तरुणांनी बाहेर धाव घेतली. त्यांनी तातडीने गंभीर जखमी स्थितीत असलेल्या नवनाथला उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, मृत नवनाथ आणि संशयित हल्लेखोर योगेश हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. योगेश याला विविध गुन्ह्यात तडीपार करण्यात आले होते. खुनाची माहिती मिळताच नवनाथ याचे नातेवाईक आणि मित्रांनी सांगली सिव्हील हॉस्पिटल आवारात मोठी गर्दी केली होती. याबाबत रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर पोलिसांनी हल्लेखोर योगेश शिंदे याला ताब्यात घेतलं आहे.