काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश बंगल्याला नोटीस बजावली होती. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंगल्याची पाहणी आणि मोजमाप केले जाण्याची शक्यता आहे. पालिकेच्या नोटीसनंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र आक्रमक झाले होते. नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते.
‘आमच्याकडेही ‘मातोश्री’चा आराखडा आहे’
महानगरपालिकेने जुहूतील बंगल्याच्या पाहणीसंदर्भात नोटीस बजावल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पलटवार केला होता. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-१, मातोश्री-२ बांधले. तेव्हा आम्ही काही म्हणालो का? भाजप-शिवसेनेची सत्ता असताना पैसे देऊन मातोश्रीवरील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले. माझ्याकडे दोन्ही मातोश्रीचे आराखडे आहेत. पण मी कधीही कोणाच्या घराविषयी काही बोलत नाही. परंतु, माझ्या जुहूतील बंगल्याविषयी राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. पण आता शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.