अहमदनगर : ‘भाजप नेत्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे त्यांच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येत आहेत. काँग्रेस विचारधारेच्या दृष्टीने हे अयोग्य वाटत असलं तरी ही वेळ भाजपमुळेच आली आहे. विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय समजत नाही, असे दिवस आले आहेत. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारलं आहे,’ असं सांगत महसूल मंत्री आणि राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या पक्षातर्फे सध्या भाजप नेत्यांच्या घरासमोर करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे समर्थन केलं आहे. (Balasaheb Thorat Ahmednagar Congress)

संगमनेरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर भाष्य केले. सध्या काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी भाजपच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे काढले जात आहेत. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रतिआंदोलन करून विरोध केला जात आहे.

Narayan Rane: नारायण राणे यांना मोठा धक्का; चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर हातोडा?

यासंबंधी विचारलं असता थोरात म्हणाले की, ‘थेट घरापर्यंत आंदोलन करण्याची काँग्रेसची ही भूमिका अयोग्य वाटू शकते. मात्र, ही वेळ भाजपच्या नेत्यांनीच आणली आहे. पंतप्रधान हे देशातील मोठे पद आहे. त्या पदावरील व्यक्तीचे संसदेतील भाषण आपल्या लोकशाहीला शोभणारे हवे. मात्र सध्या भाजपची वैचारिक पातळी घसरली आहे. त्याचाच प्रत्यय पंतप्रधानांच्या भाषणातही येतो आहे. शिवाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वडिलांचा उल्लेख करण्याची गरज नव्हती. अशा वक्तव्याचे पडसाद उमटणारच. त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलने सुरू असली तरीही आम्ही ती सौम्य पद्धतीने करून निषेध करत आहोत.’

‘चुकीचं वागणं तरी किती दिवस सहन करणार?’

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात अल्याचे सांगून थोरात म्हणाले, ‘अलिकडच्या काळात ईडीसारख्या यंत्रणाचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे आता या यंत्रणाही टीकेचे लक्ष्य बनल्या आहेत. घराघरात ईडीची चर्चा आहे. लहान मुलांच्या तोडींही ईडीची चर्चा आहे. आतापर्यंत असं कधीही झालं नव्हतं. हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाची ही पद्धत नाही. त्यामुळे असं चुकीचं वागणं तरी किती दिवस सहन करणार? जनतेनेही तशी अपेक्षा किती दिवस ठेवायची. त्यामुळे याचे पडसाद आंदोलनांच्या रुपातून उमटत आहेत. राजकराणात तत्वासाठी वाद असतातच, मात्र त्यात व्यत्तीद्वेष असता कामा नये. हे समीकरणच भाजपने बदलून टाकलं आहे,’ असंही थोरात म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत काय म्हणाले थोरात?

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंबंधी थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या अधिवेशात ही निवड होईल. यासाठी करण्यात आलेल्या नियमांनाही राज्यपालांची मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. कारण लोकसभेत ज्या पद्धतीने निवड होते, तीच पद्धत राज्यात राबवण्याचे ठरवलं आहे. विधानसभेने याला मान्यता दिली आहे. देशातील अनेक राज्यांतही हेच सूत्र आहे. त्यामुळे आपल्याकडेही राज्यपालांची मान्यता मिळेल, त्यामुळे त्यावर आता अधिक बोलण्याची गरज नाही,’ असंही थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here