कुणाच्या घरी मुलगा झाला तरी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील, फडणवीसांचा टोला
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडूनही आपली ताकद दाखवली जात आहे. रविवारी डोंबिवली मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अलीकडच्या काळात काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की, ते कशाचेही श्रेय घेतात. म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न असले तर त्याचे पण श्रेय घेतलं जातं आणि एखाद्या घरी मुलगा झाला तर तो आमच्या प्रेरणेतून झाला, अशा प्रकारे श्रेय घेण्याचे वेगवेगळे प्रयत्न अनेकांचे असतात, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपण काळजी करू नये, ज्याचं त्याचं श्रेय आहे, ज्याला-त्याला मिळत असतं आणि लोक ते देत असतात. आपण काम करत जायचं असत. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी, आपल्याला एकच प्रेरणा आहे. ती म्हणजे, शिवरायांची प्रेरणा. शिवरायांच्या प्रेरणेने आपण शेवटच्या माणसापर्यंत जाऊन काम करत राहायचं. आपण मिळेल ती संधी सामान्यांकरता वापरून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या संघर्षासाठी वापरावी, असा सल्लाही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.