तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर वर्षा बंगल्यावर आले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांची चंद्रशेखर राव यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर तेजस ठाकरे आणि केसीआर यांच्यात जुजबी संवाद झाला. वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये असलेल्या टेबलवर झालेल्या चर्चेवेळी उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव आणि तेजस ठाकरे असे तिघेचजण होते. तेजस ठाकरे एरवी पर्यावरण आणि वन्यजीवन यासंदर्भातील संशोधनात व्यग्र असतात. परंतु, अधुनमधून तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा सुरुच असतात. मात्र, आता थेट एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेला तेजस ठाकरे उपस्थित राहिल्याने ते खरंच राजकारणात सक्रिय होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
तेजस ठाकरेंच्या वाढदिवसाला ‘सामना’त नार्वेकरांची जाहिरात
गेल्यावर्षी तेजस ठाकरे यांच्या वाढदिवशी मिलिंद नार्वेकर यांनी ‘सामना’त एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या जाहिरातीमध्ये तेजस ठाकरे यांचा उल्लेख “ठाकरे कुटुंबाचा व्हिव्हियन रिचर्ड्स” असा करण्यात आला होता. खुद्द मिलिंद नार्वेकर यांनी जरी या जाहिरातीमागे राजकीय हेतू नसल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावली होती. तरीही तेजस ठाकरे यांना व्हिव्हियन रिचर्ड्स यांची उपमा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती.