नाशिक : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत मुंबईतील आझाद मैदानात २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. संभाजीराजेंच्या या भूमिकेला राज्यातील विविध जिल्ह्यांतून समर्थन मिळत असून नाशिकमधूनही हजारो मराठा बांधव मुंबईला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Sambhajiraje Chhatrapati Hunger Strike)

संभाजीराजे छत्रपती यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून हजारो मराठा तरुण सहभागी होणार आहेत. ‘मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याने समाजावर शैक्षणिक व सामाजिक अन्याय होत असल्याची भावना सर्वत्र झाली आहे. आरक्षणाची प्रक्रिया ही दीर्घकालीन व न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास काही अवधी लागू शकतो. गरीब मराठा समाजावर अन्याय होत असून आरक्षणावाचून बेरोजगार तरुण तणावग्रस्त होऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,’ अशी भूमिका घेत आपण मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आपण आमरण उपोषण करत असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली होती. या भूमिकेला नाशिकमधील मराठा संघटनांनी सक्रिय पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे.

BJP Vs Third Front : भाजप आणि तिसरी आघाडीसंदर्भात मलिक यांचा मोठा दावा, म्हणाले….

‘आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात असला तरी मराठा समाजाचे इतर काही प्रश्न आहेत ते राज्य सरकारने ठरवलं तर सोडवले जाऊ शकतात. यामध्ये सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, विद्यार्थ्यांचे वसतीगृह असे मुद्दे आहेत. याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यभरातून हजारो मराठा बांधव संभाजीराजेंसोबत मुंबईत दाखल होतील,’ असा इशारा नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

काय आहेत संभाजीराजेंच्या मागण्या?

‘आरक्षण नसल्यामुळे समाजाचे होणारे शैक्षणिक, सामाजिक व नोकऱ्यांमधील नुकसान व या अन्यायाची झळ कमी व्हावी, यासाठी आपण शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या, १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शासनाने या मागण्या मान्य देखील केल्या आहेत, मात्र आज आठ महिने उलटले तरी अजून त्यांची अंमलबावणी झालेली नाही. मराठा तरुण अजूनही अन्यायाच्या गर्तेतच सापडलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी व मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी, याकरिता मी उपोषणास बसत आहे. तसंच, या मगण्यांबरोबरच मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तात्काळ सुरुवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी,’ अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here