बुलडाणा : मुलांना घरी सोडून परतणाऱ्या सहकार विद्या मंदिराच्या बसने रस्त्याने चालणाऱ्या तरुणाला उडवले. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बुलडाणा शहरातील वावरे ले आऊट भागात आज २१ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास ही घटना घडली आहे. मोहन जगन्नाथ अवसरमोल वय ३५ वर्ष रा. केसापूर, ता बुलडाणा असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे.
मोहन अवसरमोल हा बऱ्याच वेळापासून वावरे ले आऊट भागात फिरत होता. अपघातानंतर बस चालकाने बस तिथेच उभी करून थेट पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघातास कारणीभूत ठरलेली बस पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून जमा केली असून याप्रकरणी पुढील कारवाई सुरू होती.