जळगाव : जळगाव महापालिकेतील नगरसेवकांचे पक्षांतर सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या ४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज सोमवारी पुन्हा एकदा भाजपच्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान य‍ांनी शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. (Jalgaon Muncipal Corporation)

सोमवारी अजिंठा विश्रामगृहात भाजपच्या प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान यांनी.गुलाबराव पाटील यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन सनकत, कुंदन काळे आदी उपस्थित होते.

Fodder Scam चारा घोटाळा: लालूंना शिक्षा झाल्यानंतर नितीशकुमार यांचा मोठा गौप्यस्फोट

भाजपचे एक-एक नगरसेवक शिवसेना आपल्याकडे खेचून घेत आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी जळगाव मनपात बहुमतात असलेली भाजप आज विरोध करण्यासाठीही सक्षम राहिली नसल्याचं चित्र शहरात निर्माण झालं आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शिवसेनेने भाजपच्या चार नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला होता, तर भाजपच्या इतर दोन नगरसेवकांनी ऐनवेळी शब्द बदलला होता. मात्र आम्ही भाजपमध्येच असल्याचा दावा करणाऱ्या या दोन्ही नगरसेविकांनी महासभेप्रसंगी शिवसेनेच्या तंबूत बसूनच सहभाग नोंदवला होता. शिवसेनेच्या या कुरघोडीला आगामी काळात भाजपकडून कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here