मतदारसंघात दौरा करताना आमदार रोहित पवार यांनी एका ठिकाणी थांबून मिसळ खाल्ली. त्याचे फोटो आणि सोबत एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘मतदारसंघात असताना भूक लागल्याने माहीजळगावमधील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं. आणि हो…मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही दिलं.’
आमदार पवार यांच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपशी संबंधित दोन घटनांचा एकाच पोस्टमध्ये खुबीने उल्लेख करून त्यांनी चिमटा काढला आहे. मुंबईत नुकत्याच रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी भाजपचे मंत्री आणि त्यांच्यासोबत कार्यकर्ते आले होते. त्यांनी तेथील एका ठिकाणी वडापाववर ताव मारला. मात्र बिल न देताच सर्वजण निघून गेले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांतूनही बातम्या आल्या. त्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी धावत जाऊन संबंधित हॉटेलचालकाला पैसे दिले आणि हा विषय मिटल्याचं जाहीर झाले. तोपर्यंत संबंधित नेत्याला सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका टीव्ही कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाजप नेत्याच्या पत्नीने आपला पती एकाचवेळी ३० ते ३५ पुरणपोळ्या खाऊ शकत असल्याचं सांगितलं होतं. याचीही सोशल मीडियातून चर्चा आहे. या दोन्ही घटनांचा मिश्किलपणे संदर्भ देत रोहित पवार यांनी भाजपला चिमटा काढला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.