मुंबई / रायगड : मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या कमी होत असून, तिसरी लाट जवळजवळ संपुष्टात आल्याचे चित्र आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेले निर्बंध शिथील होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यातच करोना आणि मास्कमुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. करोना अद्याप संपलेला नाही. मास्कमुक्ती कधी मिळणार असे प्रश्न आता विचारले जात आहेत. मात्र, त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंबईकरांनी करुन दाखवलं! करोना रुग्णसंख्येत ८० टक्क्यांची घट
Maharashtra Corona Update News : पॉझिटिव्ह! करोना रुग्णसंख्येत मोठी घट, ‘अशी’ आहे सद्यस्थिती

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरण वाढवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिले. करोना अजून संपलेला नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मास्क कधी काढणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. मात्र, त्याबाबत आताच काही सांगता येत नाही. आपल्याला आता जो काही वेळ मिळाला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साथ शिखरावर असताना, लसीकरण करणे कितपत योग्य आहे, हे डॉक्टर आपल्याला सांगतीलच. पण आता लाट कमी होत असताना, लसीकरण वाढवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. लसीकरणानंतरही करोनाचा संसर्ग होतो. पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचवण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai Corona Update : मुंबईत जवळपास २ वर्षांनी पहिल्यांदाच ‘असं’ घडलं; करोनाची आकडेवारी…

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र कुरा आदी उपस्थित होते

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे:

  • गेल्या दोन वर्षांत रुग्णालयांचे नुतनीकरण, नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन आदी जास्तीत जास्त कामे महाराष्ट्रात झाली.

  • आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली.

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे.

  • शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयीसुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय उभे करत आहोत.

  • मागण्या अनेक असतात. नुसत्या मागण्या करून काही होत नाही. त्याच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. आदिती तटकरे यांनी याचा पाठपुरावा केला.

  • मुंबई- पुण्याच्या सीमा लाभलेल्या या जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. उद्योग व्यवसायाचा विकास करताना निरोगी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करत आहोत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे.

  • ज्यांचे या रुग्णालय उभारणीस सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद. रुग्णालय इमारत लवकरात लवकर बांधून हे रुग्णालय सुरू होईल हे बघावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here