संचारबंदीच्या नियमाची अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी निघालेल्या जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या पथकाने माजी खासदार गांधी यांचे वाहन पकडले. गाडीत स्वत: गांधी नव्हते. त्यांचा चालक आणि स्वीय सहायक होते. त्यांच्याकडून समाधानकारक कारण न मिळाल्याने नियमानुसार कारवाई करण्यात आली. कारवाईच्या बातम्याही प्रसारित झाल्या. त्यामुळे गांधी भडकले आहेत.
पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका योग्य नसून यासंबंधी आपण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. नगर शहरातील गरजू नागरिकांच्या घरी चांगले अन्न पोहचवण्याचे काम आपण सुरु केले आहे. आज सकाळी हातमपुरा येथे माझे स्वीय सहायक व ड्रायव्हरला गाडी अडवून पोलिसांनी मारहाण केली. माझा स्वीय सहायक रोषन गांधी याने आम्ही अन्नदान करुन आता फवारणीसाठी सोडियम क्लोराइड आणण्यासाठी चाललो आहोत, असे सांगितले तरी तेथील पोलिसांनी दोघांना मारहाण केली, असा आरोप गांधी यांनी केला.
जिल्हाधिकारीच नियम पाळत नाहीत!
लॉकडाऊन असतानाही शेकडोच्या संख्येने सामाजिक काम कण्यासाठी लोक गाड्यांमधून फिरत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र माझ्याच लोकांवर कारवाई करून लगेच सोशल मीडीयावर फोटो टाकून मला बदनाम करण्याची पोलिसांची व जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका योग्य नाही, असे गांधी यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन काळात प्रशासन चांगले काम करत आहे. याबाबत आपण सतत जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. असे असताना स्वतः जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केलेल्या कारवाईचा मी निषेध करत आहे. लॉकडाऊन काळात ते स्वतः कोणतेही नियम पाळताना दिसत नाहीत. ज्या भागात पाहणी करण्यासठी ते जात आहेत तिथे त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने पोलीस व अधिकारी असतात. यावेळी ते कोणताही सोशल डिस्टन्सिगचा नियम पाळत नाहीत, तोंडाला मास्क लावत नाहीत. त्यांच्याकडूनही अनेक नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times