प्रत्येकाला हक्काचं आणि पक्क घर मिळावं अशी पंतप्रधानांची योजना आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक जण घरकुल योजनेपासून वंचित राहात असल्याचं समोर आलं आहे. तांत्रिक अडचणींमुळे नावे वगळली जात असल्याचं कारण देत स्थानिक प्रशासन देखील हात वर करत असल्याने गरजूंना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या ‘ड’ यादीत नाव नसल्याने कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील संपत डीबरे नामक ग्रामस्थाने चक्क गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
ज्यांना गरज नाही अशा अनेक लोकांची नावे घरकुल यादीत असून खरे गरजवंत मात्र वंचित असल्याचा आरोप संपत डीबरे यांनी केला आहे. संपत डीबरे हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ उडाली. कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. सर्वजण डीबरे यांना टाकीवरून उतरण्यासाठी विनंती करत होते. मात्र डीबरे काही केल्यास ऐकायला तयार नव्हते. अखेर गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, गटविकास अधिकारी आणि पोलिसांनी याप्रकरणी योग्य तो पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने तासाभरानंतर डीबरे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, संपत डीबरे यांच्या या आंदोलनामुळे उपास्थितांना शोले चित्रपटाची आठवण झाली. या ‘शोले स्टाईल’ आंदोलनाची टाकळी गावासह कोपरगाव तालुक्यात जोरदार चर्चा सुरू होती.