पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आणि या खुनातील मुख्य सूत्रधार तबरेज मेहमूद सुतार ( वय ३१, रा. वरखडेनगर, कात्रज,पुणे), किरण बबनराव साळुंखे (रा. आंबेगाव पठार, पुणे), विकी राजेंद्र जाधव (रा. वानवडी, पुणे), शंकर उर्फ तात्या आश्रुबा पारवे (रा. सुखसागर, बिबवेवाडी), नितीश उर्फ नित्या सतीश पतंगे (बिबवेवाडी, पुणे), राकेश सुरेश गायकवाड (रा. पुणे) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना शिरवळ येथे आणण्यात आलं आहे.
रविवारी सायंकाळी शिरवळ गावच्या हद्दीमध्ये फुलमळ्यालगत लेक अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे याचा अज्ञाताने गोळी झाडून खून केला होता. पोलिसांना तपासात संजय याच्या खिशात हॉटेलचे बिल मिळाले. त्यावरून पोलिसांन हॉटेल गाठले आणि सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्याच्यासोबत अजून काही लोक तेथे जेवत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीने शिरवळ पोलिसांनी आरोपींना शोधून काढले आणि पुण्यातील विविध भागातून अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर तरबेज सुतार व संजय पाटोळे यांच्यात पैशांची देवाणघेवाण झाली होती. दोघेही एकमेकांना मारण्याची धमकी देत होते, मात्र संजय याने काही पाऊल उचलायच्या आधीच तरबेजने मित्रांच्या साथीने संजय याचा खून केल्याचं उघड झालं आहे.