– सर्व यंत्रणा तिकीट दर कमी करण्याबाबत सकारात्मक

– एका दिवसात साडेसात हजार प्रवाशांनी केला

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वाढीव वातानुकूलित लोकलला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. वातानुकूलित लोकलचे दर कमी झाले नसल्याने या लोकल फेऱ्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. दर कमी करण्याबाबत केवळ आश्वासनेच मिळत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असतानाच, आता दर कमी करण्याच्या घोषणेसाठी महापालिका निवडणुकांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत असल्याची चर्चा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे मंडळ, मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे या सर्व यंत्रणा वातानुकूलित लोकल तिकीट दर कमी करण्याबाबत सकारात्मक आहे. वातानुकूलित लोकलचे तिकीट दर प्रथम श्रेणीच्या तिकीट दरापेक्षा अधिक आहेत, हे सर्व रेल्वे बाबूंना माहीत आहे. मग अडचण कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वातानुकूलित लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण तसेच कसारा आणि कर्जत मार्गावर धावत आहेत. लोकल तिकीट कमी केल्यास मुंबई महापालिकेसह ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकेतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यावर वातानुकूलित लोकल दर कमी करण्याची घोषणा करण्याची चर्चा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रंगत आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर सध्या ६० वातानुकूलित लोकल धावत आहेत. गेल्या आठवड्यात वाढीव फेऱ्या सुरू केल्यानंतर पहिल्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजेच, सोमवारी एकूण ७,४९७ प्रवाशांनी प्रवास केला. लोकल फेऱ्यांची संख्या वाढवल्याने प्रतिदिवस सरासरी प्रवासी ५० वरून १२५पर्यंत गेले आहेत. मुंबईचे दमट वातावरण लक्षात घेता भविष्यात वातानुकूलित लोकल फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

वातानुकूलित लोकलचे तिकीट दर मेट्रोच्या धर्तीवर करण्याचे नियोजन आहे. हे दर किती असतील हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. यामुळे वातानुकूलित लोकलचे दर कमी होणार कधी, याकडे सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here