रत्नागिरी: रत्नागिरीतील राजीवडाचा ३ किलोमीटरपर्यंतचा परिसर लॉकडाऊन करणार अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पत्रकार परिषदेत दिली. शिवखोल भागातील एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्यामुळेच अतिदक्षता म्हणून शिवखोलसह संपूर्ण राजीवडा भाग लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

संबंधित करोनाबाधीत कोचुवेली एक्स्प्रेसमधून १८ मार्च रोजी रत्नागिरीत आला होता. याच गाडीतून त्याच्यासोबत रत्नागिरीत १७, चिपळूणमध्ये १० तर सिंधुदुर्गात २४ प्रवासी उतरले आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण करून तपासणी केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी १४ एप्रिलपर्यंत पूर्णवेळ घरातच राहायचे आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे. मुंबई, पुणे या भागातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला द्यावी. लक्षणे असल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी. कुणी माहिती लपविल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. मागील १० दिवसांत मृत पावलेल्या सर्व व्यक्तींची माहिती मागवली जाणार आहे. कोणत्याही प्रकारे माहिती लपवून न ठेवता सामाजिक जाणिवेतून पुढे या आणि प्रशासनाला माहिती द्या, असे आवाहनही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आहे. जिल्ह्यात एकच करोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला होता. त्याच्या करोना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून हा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा करोनामुक्त झाला आहे. संबंधित करोनाबाधीत व्यक्तीने १९ मार्च रोजी मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास केला होता. हा व्यक्ती ज्या डब्यात होता त्याच डब्यात करोना पॉझिटिव्ह रुग्ण होता.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here