मुंबई: दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलीघ-ए-जमातच्या मरकजमध्ये राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले.

पुण्यात चार करोनाबाधीत

पुणे: दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलीघ-ए-जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील २५८ नागरिकांची यादी प्राप्त झाली असून त्यातील १६३ नागरिकांना ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. त्यामध्ये चार नागरिक हे करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील स्थितीची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली. ते म्हणाले, ‘निजामुद्दीन येथे झालेल्या मेळाव्याला गेलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. आतापर्यंत २५८ नागरिकांची यादी मिळाली आहे. त्यापैकी १६३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यातील चारजण हे पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. अद्याप शोध लागला नसलेल्यांपैकी ७२ जण हे परराज्यातील आहेत. त्यांचे मोबाइल फोन हे बंद आहेत’

नागपुरात १९७ सापडले, ४० जणांचा शोध सुरू

नागपूर: मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागपूरच्या २३७ जणांपैकी १९७ जणांचा शोध लागला असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. उर्वरित ४० जणांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नागपूर जिल्हा प्रशासनाला दिल्लीहून आलेल्या २६६ जणांची यादी प्राप्त झाली होती. या यादीतील ८ जण महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील आणि २१ जण हे इतर राज्यांतील असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची माहिती देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील २३७ जणांपैकी १६४ जणांना गुरुवारीच क्वारंटाइन करण्यात आले होते. शुक्रवारी ३३ जणांचा शोधले असून त्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आमदार निवास, रविभवन, वनामती येथे एकूण ४३० जणांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे विभागाय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here